जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. घाटात मदतकार्य सुरू असून खा.उन्मेष पाटील, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट देत आढावा घेतला आहे.
कन्नड घाटात दरड कोसळल्याने पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत.
घाटातील दरड आणि चिखल जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे. सध्या महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
सकाळपासूनच घाटात मदतकार्य सुरू असून अनेक वाहने चिखलात अडकून पडली आहेत. घाटात मदतकार्याच्या ठिकाणी खा.उन्मेष पाटील, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट देत आढावा घेतला आहे.
आ.मंगेश चव्हाण सकाळपासून प्रत्यक्षात मदतकार्य करीत असून रस्त्यावर गावोगावी फिरत नागरिकांशी चर्चा करीत आहेत.