जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । काेराेनाच्या लाॅकडाऊन काळात नाेकरी गेली. नवीन कामधंदा मिळत नसल्याने तणावात असलेल्या नांद्रा बुद्रुक येथील उमेश दिनेश पाटील (वय २३) या तरुणाने राहत्या घराच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. दरम्यान, उमेशच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यात ‘कामधंदा नसल्याने त्रासलाे आहे. मी जे करताेय ते चुकीचे आहे पण पर्याय नाही…’ अशा आशयाची चिठ्ठी त्याने मृत्यूपूर्व लिहून ठेवली आहे.
नांद्रा बुद्रुक येथे उमेश हा वडील दिनेश व आई जयाबाई यांच्यासह वास्तव्यास होता. तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच होता. त्यामुळे मिळेल ते काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, दोन दिवसांपासून उमेश हा आजारी होता. शुक्रवारी सकाळी वडील शेतात कामाला निघून गेल्यानंतर आई घरात काम करीत असताना, उमेशने घराच्या स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
नायलॉनच्या दोरीने मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. नांद्रा येथील सरपंच शांताराम पाटील व ग्रामस्थांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. उमेशच्या खिशात चिठ्ठी आढळली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
चिठ्ठीत लिहिलेला मजकूर
‘प्रेमप्रकरण, कुणी धमकी दिल्याचा काही एक प्रकार नाही. मम्मी,पप्पा मी जे करायला जात आहे. ते खूप चुकीचं आहे. पण माझ्याकडे पर्याय नाही. यातून तुम्हाला माझ्या जाण्याने आयुष्यभर त्रास होणार आहे. पण तुम्ही हे एक वाईट स्वप्न म्हणून विसरुन जाल. तेव्हा माझ्या आत्म्याला शांती लाभेल. पप्पा, मम्मी, तुम्ही आपली बहीण होती तेव्हा आणि त्यानंतरही आतापर्यंत खूप प्रेम केले. लाड पुरविले आहेत. खूप काही केलं तुम्ही माझ्यासाठी. त्यासाठी खूप खूप आभार. खूप वाईट वाटत आहे असं जाऊन. माझ्या मरणाला मी स्वत: जबाबदार आहे. माझं काही प्रेमप्रकरण, कोणी काही धमकी दिली असा काही एक प्रकार नाही. तसा विचार करायचा नाही. मी माझा स्वभाव, बोलणं, वागणं व कामधंदा वैगेरे याला खूप त्रासलो म्हणून हा निर्णय घेतला. आयुष्यभर तुम्ही एवढी मेहनत करता तरी आपले घर चालत नाही. मला काय झालं आणि काय होतयं ते मलाच समजत नाही. म्हणून मी इकडे तिकडे गावाला जाण्याचा प्रयत्न करत होतो. सुरतला गेलो चार दिवस खूप छान वाटले. अचानक नांद्र्याला ओढलो गेलो. माझ्या आत्महत्येचे कारण मी स्वत:च आहे, असा मजकूर उमेशने चिठ्ठीत लिहिला आहे.