
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात जळगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. कासोदा आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत दोन डंपर आणि एकूण ९ ब्रास वाळू असा तब्बल २३ लाख ४२ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २७ नोव्हेंबर रोजी कासोदा आणि अमळनेर पोलिसांनी ही कारवाई केली.
कासोदा पोलिसांची कारवाई
कासोदा उतराण रोड, इंदिरा नगर परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. यावेळी धर्मेश कैलास पाटील आणि आकाश राजेंद्र पाटील यांच्याकडून वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेण्यात आला. या डंपरमध्ये ३ ब्रास वाळू आढळून आली. वाळूसह डंपर असा एकूण ४ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेरमध्येही डंपर जप्त
अमळनेर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत गांधीली ते अमळनेर रोडवर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून कारवाई केली. नवलभाऊ आर्मी स्कूलसमोर संशयित डंपर थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये ६ ब्रास वाळू आढळली.
या प्रकरणी चालक अनिल चंद्रसिंग मोरे आणि डंपर मालक अकबर पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाळूसह डंपर असा १८ लाख ५८ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २ गुन्हे दाखल करून ९ ब्रास वाळूसह दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत. अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत कसोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्यासह त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.




