
जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्या-चांदीच्या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. जळगावच्या सराफ बाजारात २५ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. आज सोने दरात प्रति १० ग्रॅम ३५०० रुपयाची घसरण झाली. तर चांदी दरात प्रति किलो ८००० रुपयांनी घसरला आहे. विशेष लग्नसराईचा हंगाम सुरू असताना झालेल्या या दरकपातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आजचे सोने-चांदीचे दर
जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ११ हजार ७५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २२ हजार रुपये इतका झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, एक किलो चांदीचा भाव १ लाख ४८ हजार रुपये झाला आहे.
लग्नसराईत ग्राहकांना दिलासा
सध्या लग्नसराईची लगबग सुरू असल्याने सोने-चांदीच्या दागिन्यांना मागणी वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दरात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याने ग्राहक संभ्रमात होते. अशातच आज झालेल्या मोठ्या दरकपातीमुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सोन्या-चांदीचे दर आणखी घसरणार की पुन्हा वाढणार, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.





