
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहाजवळ नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती ठेवून काहीतरी विधी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुकारामवाडी परिसरात राहणारे अनिल तुळशीराम चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. सोमवारी (२३ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता नेरी नाका येथील स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचे भाचे रवींद्र चौधरी स्मशानभूमीत पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती आढळून आली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती या वस्तू घेऊन अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी काही हालचाली करताना आणि वस्तू जळत्या ठिकाणी टाकताना दिसत असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती रवींद्र चौधरी यांनी दिली.





