गुन्हेजामनेर

जामनेरमध्ये गावठी दारू निर्मितीचा पर्दाफाश; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. जामनेर तालुक्यातील गोंदे गावात फत्तेपूर पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी दारू निर्मितीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल १ हजार लिटर कच्चे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले, तर ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार तसेच फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने गोंदे गाव परिसरात छापा टाकला.

या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील कच्चे रसायन पोलिसांना आढळून आले. सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांनी जागेवरच नष्ट केले. यासोबतच विक्रीसाठी तयार असलेली ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

चौघांविरोधात गुन्हे दाखल

या प्रकरणी जाबीर हसन तडवी, फकीरा रमेश तडवी, हजराबाई युनूस तडवी आणि रहमान कासम तडवी या चौघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या कारवाईत कच्चे रसायन आणि तयार गावठी दारूसह एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button