गुन्हेजळगाव जिल्हा

लग्नातील वादाचे रूपांतर हत्येत! जळगावच्या बोरनारमध्ये तरुणाचा निर्घृण खून

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्याला गालबोट लागणारी धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून २३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता. त्याचे आई-वडील बोरनार येथे राहत असल्याने तो दोन दिवसांपूर्वी गावी आला होता. बुधवारी सायंकाळी गावात आयोजित एका लग्नसोहळ्यासाठी तो उपस्थित होता. यावेळी काही जणांसोबत त्याचा वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झालेल्या या वादाचे पुढे हाणामारीत रूपांतर झाले. दरम्यान, एका अज्ञात हल्लेखोराने प्रेम याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेमचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच घटनेशी संबंधित माहिती आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रेम धनगर याच्याविरुद्ध यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, लग्नसोहळ्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? हत्येचा कट होता की अचानक झालेल्या वादातून हा प्रकार घडला? तसेच हल्ल्यामागे नेमके कोण होते? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, संशयितांचा शोध सुरू आहे. लग्नसोहळ्यात झालेल्या या रक्तरंजित घटनेने बोरनार परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button