
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात हवाल्याच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत असल्याच्या संशयावरून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ममुराबाद रोडवरील विटभट्टीजवळ अडावद येथील दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत साडेसात लाख रुपयांची रोकड, बुलेट मोटारसायकल आणि दोन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अडावद येथील दोन तरुण हवाल्याच्या माध्यमातून पैसे गोळा करून त्या रकमेतून सोन्याची बिस्किटे खरेदी करतात आणि त्याचे पार्सल पाठवतात, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी इम्रान रहिम बेग आणि मंगळ नथ्यु साळुंके यांना तपासासाठी पाठवण्यात आले.
१६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील विटभट्टीजवळ बुलेटवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडवले. त्यांची चौकशी केली असता हरीष राजेंद्र महाजन (वय ३०) आणि सुजित गोकुळ महाजन (वय २६, दोघे रा. बालाजी मंदिराजवळ, अडावद, ता. चोपडा) अशी त्यांची नावे समोर आली.
पोलिसांनी त्यांच्याकडील बॅगांची झडती घेतली असता १०० रुपयांच्या नोटांमध्ये ५ लाख रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये २ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली. याशिवाय २ लाख ५० हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल, ६५ हजार रुपयांचा आयफोन, २८ हजार रुपयांचा विवो मोबाईल आणि २ हजार १२० रुपये रोख रक्कम असा एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षक रहीम रज्जाक शेख यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत जप्तीचा पंचनामा केला. पोलीस कर्मचारी इम्रान रहिम बेग यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ अन्वये नॉन-कॉग्निझेबल गुन्हा रजिस्टर क्रमांक ९८७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रहीम रज्जाक शेख, इम्रान रहिम बेग, मंगळ नथ्यु साळुंके आणि विजय निकम यांनी सहभाग घेतला.





