
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, सोमवारी शहराचे किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. यामुळे जळगावकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. मात्र, जळगावकरांचा हा थंडीचा आनंद फार काळ टिकण्याची शक्यता नाही. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाल्याने पुढील काही दिवसात हवामानात मोठा बदल होण्याचे संकेत असून, जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रात्रीच्या तापमानात घट होत असल्याने जळगावमध्ये कडाक्याची थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे.रात्रीसह पहाटे गारवा आणि काही भागांत धुक्याचे वातावरण जाणवत आहे. सोमवारी शहराचे किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. गतवर्षी १६ नोव्हेंबर रोजी जळगावचा पारा ८.७ अंशांवर होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमान सुमारे ४ अंशांनी अधिक असले, तरी हंगामातील नीचांकी पातळी गाठल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे.
आगामी काही दिवस रात्रीचे तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता असून, २० नोव्हेंबरपर्यंत हे क्षेत्र तयार होऊन २३ नोव्हेंबरपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकून छत्तीसगड आणि विदर्भाच्या दिशेने सरकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यातील वातावरणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होऊन निर्माण झालेली थंडी काही दिवसांनंतर कमी होऊ शकते. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आगामी काळात जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामानातील या बदलामुळे काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
यंदाचे वर्ष ‘एल निनो’चे वर्ष असल्याने समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत गेल्या एका महिन्यात दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली असून, आता तिसरे वादळ आकारास येण्याची शक्यता आहे.





