जळगाव जिल्हागुन्हे

Jalgaon : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लाचेचा मोह नडला! १५ हजार रुपये स्वीकारताना ACBने पकडले

जळगाव लाईव्ह न्यूज । वीजचोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईने महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार ४० वर्षीय असून ते जळगाव शहरातील रहिवासी आहेत. आरोपींमध्ये विशाल वसंत नेमाडे (वय ३७, सहायक अभियंता), भरत कडू तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ) आणि रविंद्र छन्नू पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ) यांचा समावेश आहे. हे तिघेही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जळगाव शहरातील महसूल व देयक उपविभागात कार्यरत आहेत.

ACBच्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी तक्रारदाराच्या घरी नवीन वीजमीटरची तपासणी करण्यासाठी पथक गेले होते. यावेळी घरातील वीज उपकरणांची पाहणी करून फोटो काढण्यात आले. त्यानंतर आरोपी क्रमांक दोन यांनी तक्रारदाराला फोन करून पांडे चौकात बोलावले. तेथे आरोपींनी घरातील विजेचा वापर मंजूर लोडपेक्षा अधिक असल्याचे तसेच सर्व्हिस वायरला बायपास करून वीजचोरी होत असल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार ACB पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी क्रमांक दोन व तीन यांनी ४० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम आरोपी क्रमांक एक यांच्यामार्फत स्वीकारण्याचे ठरले होते.

त्यानुसार शनिवारी पांडे चौक परिसरात ACBने सापळा रचला. यावेळी आरोपी क्रमांक दोन यांनी आरोपी क्रमांक एक यांना लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार १५ हजार रुपये स्वीकारताच ACB पथकाने आरोपी क्रमांक एक यांना रंगेहात पकडले. या कारवाईत अन्य दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षण केले. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACBने दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button