
जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्यातून गांजाच्या अवैध लागवडीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी खान्यापाडाव शिवारात एका धडक कारवाईत तब्बल १ हजार ८७० किलो गांजासदृश वनस्पतींचा अवैध साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, वनविभागाच्या जागेवर ही शेती केली जात होती, मात्र पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खान्यापाडाव येथील जुम्मा आरसी पावरा याने वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक २४० मधील जमिनीवर गांजासदृश अंमली पदार्थाच्या वनस्पतींची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज ११ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी शेतामध्ये चार ते सहा फूट उंचीची हिरवीगार झाडे आढळून आली. या झाडांना पाने, फांद्या आणि मुळे असल्याचेही निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये ठेवलेला संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजनकाट्यावर करण्यात आलेल्या मोजणीत ट्रॅक्टरसह मालाचे वजन ६ हजार २६० किलो, तर रिकाम्या ट्रॅक्टरचे वजन ४ हजार ३९० किलो भरले. त्यानुसार जप्त करण्यात आलेल्या वनस्पतींचे निव्वळ वजन १ हजार ८७० किलो निश्चित झाले. प्रति किलो २५ हजार रुपये दराने या मुद्देमालाची किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जप्त केलेल्या वनस्पतींचे नमुने पुढील रासायनिक तपासणीसाठी वेगळे ठेवण्यात आले आहेत. हिरवी पाने, फांद्या आणि बिया असलेल्या वनस्पतींसह शेतातील मातीचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेतील अहवालानंतर जप्त केलेल्या वनस्पतींचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, पोलिसांचे पथक शेतात पोहोचल्याची चाहूल लागताच संशयित जुम्मा आरसी पावरा याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पसार संशयिताचा शोध सुरू असून, या लागवडीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत होते का, याचाही पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संजय सोनवणे पुढील तपास करीत आहेत.





