धरणगाव

पाळधीत १५ नोव्हेंबरला मोफत नेत्र शिबिर ; प्रतापराव पाटील, विक्रम पाटलांचा स्तुत्य उपक्रम..

जळगाव लाईव्ह न्यूज । पाळधी (ता.धरणगाव) येथील जी.पी.एस. मित्र परिवार, पाळधी आणि पनवेल येथील अत्याधुनिक आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, मेनरोड येथे हे शिबिर पार पडणार आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील आणि युवानेते विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून गरजू रुग्णांना मोफत नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिबिरात नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार असून, तपासणीदरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या रुग्णांवर पनवेल येथील आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पद्धतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांच्या पनवेल येथील प्रवासासह निवास, चहा, नाश्ता आणि जेवणाची संपूर्ण व्यवस्था जी.पी.एस. मित्र परिवाराच्या वतीने विनामूल्य करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे नेत्रोपचार घेण्यास अडचण येणाऱ्या गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या सामाजिक उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि मोफत नेत्र तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जी.पी.एस. मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button