
पोखरी–पाळधी शिवारातील १४.०९ लाखांच्या शेत पाणंद रस्त्याचे भूमिपूजन
प्रतापराव पाटील यांच्या विशेष नियोजनातून एक किलोमीटरचा शेतरस्ता मार्गी
जळगाव लाईव्ह न्यूज । “शेतकरी वर्षभर ऊन, वारा, पाऊस सहन करून काळ्या आईत राबतो. मात्र, स्वतःच्या शेतात जाण्यासाठीच त्याला चिखलातून वाट काढावी लागते, ही परिस्थिती बदलली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी पाणी आणि विजेइतकाच शेतापर्यंत जाणारा चांगला रस्ताही महत्त्वाचा आहे. शेतीची कामे वेळेवर व्हावीत, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व खर्च वाचावा, यासाठी जळगाव जिल्ह्यातील शेत पाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत विकास पोहोचवणे आणि त्याच्या कष्टाला आधार देणे, हीच आपली प्राथमिकता असून शेतरस्त्यांच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील पोखरी–पाळधी शिवारात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत १४ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या एक किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार व युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या विशेष नियोजनातून रामेश्वर सोमाणी यांच्या शेतापासून रत्नाकर पंडित यांच्या शेतापर्यंतच्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर होऊन शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना व संबंधित रस्त्याच्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव ननवरे यांनी केले, तर आभार नवल पारधी यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, शाखा अभियंता विशाल पाटील, वीरेंद्र पाटील, माजी सरपंच भागवत पाटील, माजी सभापती मुकुंदराव ननवरे, गजानन पाटील, नवल पारधी, महेंद्र पारधी, उपसरपंच अनिल कासट यांच्यासह तलाठी, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





