राजकारणमहाराष्ट्र

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; गिरीश महाजनांच्या विधानावर रोहित पवारांचा संताप..

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करत असताना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी गरज नसल्यास ही रक्कम सरकारला परत करावी, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गिरीश महाजन यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी त्यांना चांगलेच सुनावले. “गिरीश महाजन साहेबांना मला सांगायचे आहे की, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एकीकडे पाच हजार रुपये देऊन तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतमजुरांना तर तुम्ही कोणतीही मदत केली नाही. पवित्रभूमी नाशिकमध्ये जिथे महाकुंभ होणार आहे, तिथे हजारो कोटींचा भ्रष्टाचार करत आहात आणि दुसरीकडे गरिबांच्या बाबतीत मात्र दिलेले पैसे परत मागत आहात,” अशा शब्दांत त्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, या सरकारमधील प्रत्येकाला याची लाज वाटली पाहिजे. सरकारमधील नेत्यांना नेमके काय कळते, असा सवाल उपस्थित करत अशा नेत्यांना योग्यवेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

नेमके काय म्हणाले होते गिरीश महाजन?

शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना ही रक्कम परत करण्याचे आवाहन केले होते. “सरकारने सर्व शेतकऱ्यांना पाच-पाच हजार रुपयांची मदत दिली आहे. मात्र, अनेक शेतकरी असे आहेत की, ज्यांना या पैशांची आवश्यकता नाही. आज सकाळपासून माझ्याकडे ५० शेतकरी आले. त्यांनी आम्हाला पाच हजार रुपये मिळाले आहेत, मात्र आम्हाला त्याची गरज नाही, आमचा जोडधंदा आहे आणि आर्थिक परिस्थितीही चांगली आहे, त्यामुळे हे पैसे परत करायचे आहेत, असे सांगितले,” असे महाजन म्हणाले होते.

तसेच, ज्यांना आर्थिकदृष्ट्या या मदतीची आवश्यकता नाही, अशा सक्षम शेतकऱ्यांनी पाच हजार रुपयांची रक्कम सरकारला परत करावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.

दरम्यान, महाजन यांच्या या आवाहनावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button