
जळगाव लाईव्ह न्यूज । शेतात पिकांच्या आड गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रकार जामनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. मालदभाडी शिवारात जामनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अंदाजे किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये किमतीचा १३ किलो ४३० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मुळासकट जप्त करण्यात आली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संबंधित संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
मालदभाडी गावाच्या हद्दीतील एका शेतात गांजाची लागवड सुरू असल्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (५ नोव्हेंबर) दुपारी सव्वादोनच्या सुमारास संबंधित शेतावर अचानक छापा टाकला. यावेळी शेतात ७ ते ८ फूट उंचीची गांजाची हिरवीगार झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून आली. या झाडांना पाने, फुले आणि बोंडे लागलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून ही झाडे मुळासकट उपटून ताब्यात घेतली. जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन १३ किलो ४३० ग्रॅम भरले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांजाचा बाजारभाव २५ हजार रुपये प्रति किलो असा धरून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये आहे. या कारवाईदरम्यान शेतमालक अनिल दगडू पाटील (रा. मालदभाडी, ता. जामनेर) हा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस पथक शेतात पोहोचताच तो तेथून पसार झाल्याचे समोर आले.
अनिल पाटील याने स्वतःच्या शेतात अंमली पदार्थ असलेल्या कॅनाबिस वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याचा आरोप आहे. चोरट्या विक्रीच्या उद्देशाने ही लागवड करण्यात आल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेश विलास लहासे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(ब) आणि २०(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईनंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंखे करत आहेत.
शेतात पिकांसोबत गांजाची लागवड सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मालदभाडी परिसरासह जामनेर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.





