
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील शास्त्रीनगर परिसरात महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या माधवराव उर्फ नंदूमामा माणिकराव देशमुख यांनी राहत्या घरी गळ#$फास घेऊन आत्म#$हत्या केल्याची घटना समोर आली आहे. देशमुख यांच्यावर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती असून, कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पुत्र ओम देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
माधवराव उर्फ नंदूमामा देशमुख हे जळगाव महापालिकेच्या चौबे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध खासगी फायनान्स कंपन्या तसेच काही खासगी व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. त्यांच्यावर अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.
देशमुख यांचे पुत्र ओम देशमुख यांनी केलेल्या आरोपानुसार, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी घरी येत होते. यावेळी धमकावून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, फोनवरून संबंधित मॅनेजरशी बोलायला लावून शिवीगाळ केली जात असल्याचा दावाही ओम देशमुख यांनी केला आहे. या कथित मानसिक छळामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेनंतर देशमुख कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कथितरीत्या मानसिक त्रास दिल्याच्या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या आरोपांची चौकशी आणि पोलिस तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.





