गुन्हेरावेर

रावेरमध्ये एसीबीचा दणका! २० हजारांची लाच घेताना वनरक्षक जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणातून गाळ काढण्याच्या कामासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील एका वनरक्षकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दणका दिला आहे. मंगरूळ धरणातून गाळ काढण्यासाठी जेसीबीचा वापर केल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनरक्षक जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७) याला पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणातील तक्रारदार रावेर येथील अर्थमूव्हर्स एजन्सीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे स्वतःचे जेसीबी मशीन आहे. तक्रारदारांच्या परिचित व्यक्तीने स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावे मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ काढण्याचा आणि त्याची वाहतूक करण्याचा परवाना पाटबंधारे उपविभाग, रावेर येथून घेतला होता. संबंधित ठिकाण वनरक्षक जगदाळे याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने त्याने या कामाच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली.

जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याच्या कामासाठी २० हजार रुपये, तर ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक केल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या वेळी जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याच्या कामाच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने रावेर-बऱ्हाणपूर मार्गावरील साईनाथ ज्यूस सेंटर येथे सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनरक्षक जगदाळे याला पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

एसीबीच्या पथकाची कारवाई

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार किशोर महाजन तसेच पोलीस अंमलदार भूषण पाटील, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांचा सहभाग होता. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button