जळगाव जिल्हा

जळगावच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ! जिल्ह्यातील ५५० बोगस वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५५० बोगस वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे संबंधित शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांमध्ये खळबळ उडाली असून, मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

या घोटाळ्यात शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. नाशिक विभागातील संशयित प्रकरणांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) छाननी करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यात बोगस वैयक्तिक मान्यता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळविल्याची अनेक प्रकरणे समोर आले. त्यानंतर सुमारे ५५० मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती असून त्यामुळे जिल्ह्यातील या मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी काळात कारवाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बोगस मान्यता रद्द करण्यासंदर्भातील आदेश संबंधित संस्थाचालकांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण विभागाकडून संबंधित संस्थांना आदेश बजावण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात माध्यमिक शिक्षण विभागातील काही प्रकरणेही चर्चेत आली आहेत. मान्यता प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

दरम्यान, या प्रकरणात अनियमिततेच्या काळात संबंधित पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. नियमबाह्य पद्धतीने वेतन घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून रकमेची वसुलीही केली जाऊ शकते. त्यामुळे बोगस मान्यतांच्या आधारे नियुक्ती मिळविणारे शिक्षक, संबंधित संस्थाचालक आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button