
जळगाव लाईव्ह न्यूज । ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनकार्यावर आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘प्रहार’ चित्रपटाचा अनुभव दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबलमधील २६८ विद्यार्थ्यांनी घेतला. दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी आयोजित या विशेष चित्रपट प्रदर्शनात ३१ कर्मचारीही सहभागी झाले. अंध आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेमुळे हा उपक्रम सर्वसमावेशकतेचा प्रेरणादायी अनुभव ठरला.
चित्रपटातून विद्यार्थ्यांना २६/११ च्या हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूरवीरांचे शौर्य, त्याग आणि निष्ठा अनुभवता आली. तसेच या खटल्यातील कायदेशीर प्रक्रिया, पुराव्यांचे महत्त्व, संविधानाची ताकद आणि न्यायव्यवस्थेची भूमिका यांविषयी त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी केलेली विशेष व्यवस्था. अंध विद्यार्थ्यांना प्रसंग समजावेत, म्हणून त्यांच्यासोबत विद्यार्थी मित्र-मैत्रिणींची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी दृश्ये, प्रसंग आणि घटनाक्रम समजावून सांगत अंध विद्यार्थ्यांना चित्रपटाचा आनंद घेण्यास मदत केली. कर्णबधिर विद्यार्थ्यांना संवाद आणि आशय समजावा, यासाठी सांकेतिक भाषेच्या दुभाषाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे चित्रपटाचा अनुभव घेता आला आणि सर्वसमावेशक समाजाचे सुंदर दर्शन घडले.
चित्रपट पाहिल्यानंतर २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस आणि इतर शूरवीर यांच्याविषयीची कृतज्ञता व आदराची भावना विद्यार्थ्यांच्या मनात अधिक दृढ झाली. न्याय मिळवून देण्यासाठी पुरावे, साक्षीदार, तर्कशुद्ध युक्तिवाद आणि संविधानिक मूल्ये किती महत्त्वाची असतात, याचीही जाणीव त्यांना झाली.
विद्यार्थी अक्षय हाडके याने व्यक्त केली चित्रपटातून मिळालेली शिकवण
प्रतिक्रिया व्यक्त करताना अक्षय हाडके म्हणाला, “या चित्रपटातून न्याय हा भावनांवर नव्हे, तर पुराव्यांवर आणि संविधानाच्या चौकटीत चालतो, हे शिकायला मिळाले. भारतीय न्यायव्यवस्थेची ताकद आणि विशेष सरकारी वकिलांची जबाबदारी यांची जाणीव अधिक खोलवर झाली. हा चित्रपट केवळ माहिती देणारा नसून देशप्रेम, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा आदर करायला शिकवणारा अनुभव आहे. आदरणीय. ॲड.उज्ज्वल निकम साहेबांकडून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळाली.”
हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये, कायद्याविषयी आदर आणि सर्वसमावेशकतेची भावना रुजवणारा ठरला. दिव्यांग विद्यार्थ्यांना समान संधी देत, प्रत्येकाला शिक्षण, माहिती आणि सांस्कृतिक अनुभवांचा समान आनंद घेता यावा, या दृष्टिकोनातून हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला. या उपक्रमासाठी दीपस्तंभ फाऊंडेशन चे डॉ. रवी महाजन व अनिल भोळे यांचे सहकार्य लाभले.





