
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भीषण अपघाताची बातमी समोर आलीय. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा भीषण अपघात जामनेर-बोदवड मार्गावरील मालदाभाटीजवळ आज दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास घडला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. एका अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघात नेमका कसा घडला, दुचाकीवर किती जण प्रवास करत होते आणि ट्रकची धडक कशा प्रकारे झाली, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मृतांची अधिकृत ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबतही अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. जामनेर तालुक्यातील या भीषण दुर्घटनेने परिसर हादरला असून, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मन सुन्न करणारी आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतर अपघाताचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.





