
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून २८ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अर्जुन रोहिदास राठोड असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या उजव्या कानाखाली गोळी लागली आहे. जखमी अर्जुनवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन राठोड याचा प्रॉपर्टीच्या वादातून काही जणांसोबत जुना वाद सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल असल्याचे जखमी अर्जुनने सांगितले. याच वादातून जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रुग्णालयाजवळ रात्रीच्या सुमारास त्याची हल्लेखोरांसोबत बाचाबाची झाली.
बाचाबाचीनंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार
वादाचे रूपांतर हल्ल्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाचाबाचीनंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अर्जुनवर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या उजव्या कानाखाली गोळी लागल्याने तो जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दोघांनी पैसे दिल्याचा जखमीचा आरोप
या हल्ल्यामागे प्रॉपर्टीचा वाद असल्याचा आरोप जखमी अर्जुनने केला आहे. तसेच, आपल्यावर हल्ला करण्यासाठी दोन जणांनी हल्लेखोरांना पैसे दिल्याचा आरोपही त्याने केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी अर्जुनची विचारपूस केली. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण होते आणि या घटनेमागे नेमके कोण आहे, याचा तपास सुरू आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जात असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





