
जळगाव लाईव्ह न्यूज । मागील काही दिवसांपासून घसरणीच्या मार्गावर असलेल्या सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज शुक्रवारी सकाळी सोन्याच्या भावात तब्बल १५०० रुपयांहून अधिकची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे चांदीची तब्बल ३ हजार रुपयाने वधारली आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना पुन्हा महागाईचा झटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतल्याने बाजारातील चित्र बदलले आहे.
अमेरिकन डॉलर कमकुवत होणे, बाँड यील्डमधील घसरण आणि जागतिक पातळीवरील अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंच्या दरांना आधार मिळत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचे पडसाद भारतीय सराफा बाजारातही उमटत असून, जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांची पुढील वाटचाल कशी राहणार, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
जळगावात काय आहे सोन्याचा दर?
जळगावच्या सराफ बाजारात आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति तोळा १५४५ रुपयांची वाढ झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५४,१९१ रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी काल गुरुवारी दिवसभरात १०३ रुपयांची किरकोळ घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६४६ रुपयांपर्यंत खाली आले होते.
चांदीचा दर?
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी वाढ झाली. सकाळी चांदीचा दर प्रति किलो ३०९० रुपयांनी वाढला. यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३०,७२० रुपयांपर्यंत वधारली. यापूर्वी गुरुवारी दिवसभरात ३०९० रुपयांची घट झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,२७,६३० रुपयांपर्यंत खाली आली होती.





