
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळावरून नवी मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू होणार असून, २५ ऑक्टोबरपासून फ्लाय ९१ कंपनीचे विमान जळगावहून नवी मुंबईकडे उड्डाण करणार आहे. या बहुप्रतीक्षित विमानसेवेचे अधिकृत भाडेपत्रक आता कंपनीने जाहीर केले आहे.
या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्व वैधानिक कर आणि विमानतळ शुल्कासह किमान १ हजार ८५४ रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, विमानसेवा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही तिकीट बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही.
गेल्या काही वर्षांपासून जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१कडून पुणे, गोवा आणि हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा दिली जात आहे. आता कंपनीकडून मुंबई हा चौथा मार्ग सुरू केला जात आहे. या नव्या सेवेमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट विमानप्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. जळगावहून नवी मुंबईसाठी आठवड्याच्या सातही दिवशी फ्लाइट उपलब्ध राहणार असल्याचं समजते. या सेवाला काही दिवस शिल्लक असताना आता कंपनीने जळगाव ते नवी मुंबई विमानसेवेचे अधिकृत भाडेपत्रक जाहीर केले.
कंपनीच्या दरपत्रकानुसार, जळगाव ते नवी मुंबई विमानप्रवासाचे मूलभूत भाडे १ हजार ५०३ रुपयांपासून सुरू होणार आहे. या भाड्यावर ५ टक्के जीएसटीसह विमानतळाची युजर डेव्हलपमेंट फी आणि एव्हिएशन सिक्युरिटी फी अशा विविध शुल्कांचा समावेश होऊन सुमारे ३५१ रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत. त्यामुळे सर्व कर व शुल्कांसह प्रवाशांना किमान १ हजार ८५४ रुपये तिकीट दर पडणार आहे.
मागणी आणि प्रवासाच्या वेळेनुसार तिकिटाच्या मूलभूत भाड्यातही बदल होणार आहे. हे भाडे १ हजार ६९४ ते २ हजार ६४६ रुपये इतके असू शकते. तर प्रीमियम श्रेणीतील तिकीट ३ हजार ५०३ रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. ऑनलाइन बुकिंग करताना प्रत्येक प्रवाशामागे २९९ रुपये कन्व्हेनिअन्स फी अतिरिक्त आकारली जाणार आहे.
बुकिंग सुरू होण्याची प्रतीक्षा
फ्लाय ९१ कंपनीने २५ ऑक्टोबरपासून जळगाव-नवी मुंबई विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून तिकीट विक्री सुरू होईल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, १ ऑक्टोबर उलटून आठवडा झाला तरी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या विमानसेवेचे बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही.
दरम्यान, विमानसेवेचे भाडेपत्रक जाहीर झाल्याने आता तिकीट बुकिंग कधी सुरू होते, याकडे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे. कंपनीकडून लवकरच ऑनलाइन बुकिंग सुरू होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.





