
जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, इलेक्ट्रिक मोटार, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी भंगार दुकानांची तपासणी करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी चार भंगार दुकानांवर कारवाई करत तब्बल 75 हजार 400 रुपयांचा कॉपर आणि अॅल्युमिनियम तारसाठा जप्त केला आहे.
चार भंगार दुकानांची तपासणी
दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने वरखेडी, भोकरी तसेच लोहारा दुरक्षेत्रातील कु-हाड गावातील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान भोकरी येथील कलीम नबी काकर यांच्या भंगार दुकानातून 32 किलो वजनाची अंदाजे 32 हजार रुपये किमतीची कॉपरची तार आढळून आली. त्याचप्रमाणे हकीम आब्बाज काकर यांच्या दुकानातून 10 किलो वजनाची 10 हजार रुपये किमतीची कॉपरची तार जप्त करण्यात आली.
तसेच राजू उस्मान काकर यांच्या दुकानातून 14 किलो वजनाची 1 हजार 400 रुपये किमतीची अॅल्युमिनियमची तार मिळून आली. कु-हाड गावातील अब्बुजर हकीम काकर यांच्या भंगार दुकानातून 32 किलो वजनाची 32 हजार रुपये किमतीची कॉपरची तार पोलिसांनी जप्त केलीअशा प्रकारे चारही ठिकाणांहून एकूण 75 हजार 400 रुपये किमतीचा कॉपर व अॅल्युमिनियम तारसाठा पोलिसांच्या हाती लागला.
खरेदी-विक्रीचे कागदपत्रे नसल्याने कारवाई
पोलिसांनी संबंधित भंगार व्यावसायिकांकडे जप्त करण्यात आलेल्या साहित्याबाबत आवश्यक कागदपत्रे तसेच खरेदी-विक्रीचे पुरावे मागितले. मात्र, समाधानकारक माहिती किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर संबंधित चारही व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या तारसाठ्याचा चोरीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम
शेतकऱ्यांच्या शेतातील वायर, इलेक्ट्रिक मोटार, महावितरणच्या केबल आणि सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासोबतच चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ अतुल पवार, अभिजीत निकम, पोना दीपक अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण देशमुख, भारत पाटील, शाम हटकर, मनोज बडगुजर आणि नामदेव इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





