
जळगाव लाईव्ह न्यूज । ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 70 रुपयांची वाढ करण्यात आली असून यामुळे हॉटेल, खानावळ, केटरिंगसह विविध व्यवसायांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. या दरवाढीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी खोचक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “हल्ली 1 तारीख आली की मनात धडकी भरते. सरकार कुठल्या बाजूने आम्हा सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईक करेल सांगता येत नाही.”
पुढे त्यांनी म्हटले आहे की, 1 ऑक्टोबरपासून जनतेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित विविध नियम लागू करण्यात आले असून, सामान्य जनतेला त्याचा झटका बसला आहे. त्यातच व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 70 रुपयांची वाढ करून ‘बोनस’ झटका देण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
हल्ली १ तारीख आली की मनात धडकी भरते. सरकार कुठल्या बाजूने आम्हा सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईक करेल सांगता येत नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) October 1, 2026
आज १ ऑक्टोबरपासून जनतेच्या आर्थिक गोष्टींवर विविध नियम लावून सामान्य जनतेला झटका दिलाच होता पण व्यवसायिक सिलेंडरचे दर ७० रुपयांनी वाढवून 'बोनस' झटका दिला आहे.… pic.twitter.com/r26CNo4B8x
‘9 महिन्यांत जवळपास 1500 रुपयांची वाढ’
रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील वाढीचा उल्लेख करत वर्षाच्या सुरुवातीला 1,684 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता 2,954 रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला आहे. म्हणजेच अवघ्या नऊ महिन्यांत जवळपास 1,500 रुपयांची वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरवाढीमुळे व्यावसायिकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागणार असून, त्याचा परिणाम खाद्यपदार्थ आणि इतर सेवांच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.





