
जळगाव लाईव्ह न्यूज । हिमाचल प्रदेशात खून करून मुंबईच्या दिशेने पळून जाणाऱ्या चार संशयित आरोपींना जळगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. चंदन कुमार, रोशन गोगल मुखिया, संतोष कुमार आणि अजित कुमार जोगा मेहतो अशी अटक केलेल्यांची नावे आहे. पैसे संपल्याने आणि भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी आरोपी जळगावात उतरले आणि याचदरम्यान शनिपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
काय आहे प्रकरण?
हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयत मुकेश कुमार आणि आरोपी एकत्र दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. यावेळी मयताने आरोपींच्या बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी मुकेश कुमार यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी जळगाव पोलिसांना दिली.
खून केल्यानंतर मुंबईकडे पलायन
घटनेनंतर आरोपी किसंपूर येथून सकाळी सुमारे ११ वाजता निघाले. त्यानंतर ते अंबाला येथे पोहोचले. तेथून दुपारी सुमारे ४.३० वाजता मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. प्रवासादरम्यान आरोपींकडील पैसे संपले. त्यातच भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी त्यांनी जळगाव येथे उतरण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू होता.
लोकेशन मिळताच जळगाव पोलिसांची धाव
आरोपींचे लोकेशन जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता आरोपींचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाने परिसरात शोधमोहीम राबवत आरोपींचा माग काढला. अखेर अत्यंत शिताफीने आणि समन्वयाने कारवाई करत चारही आरोपींना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेले चौघे बिहार राज्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिमाचल प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संबंधित प्रकरणाचे तपासी अधिकारी आरोपींचा ताबा घेण्यासाठी जळगावकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईत शनिपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांनी सहभाग घेतला.





