भुसावळरेल्वे

दिवाळीला गावी जाणाऱ्यांसाठी खुशखबर ! जळगाव-भुसावळमार्गे ३ विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातून उत्तर भारत आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या तीन साप्ताहिक उत्सव विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हजूर साहिब नांदेड–हजरत निजामुद्दीन, जालना–छपरा आणि हजूर साहिब नांदेड–उधना या तीन मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहे. या गाड्यांच्या माध्यमातून एकूण ३८ फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.

विशेष म्हणजे या गाड्यांना जळगाव आणि भुसावळसह जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळी आणि छठसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या तसेच गुजरातकडे प्रवास करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

नांदेड–निजामुद्दीन विशेष गाडीच्या १४ फेऱ्या

हजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीनदरम्यान विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०७६२१ नांदेडहून १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६२२ निजामुद्दीनहून १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी रात्री ९.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३५ वाजता नांदेडला पोहोचेल. दोन्ही दिशांच्या मिळून या गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत.

या विशेष गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे. गाडीमध्ये प्रथम एसी, एसी-२ टियर, एसी-३ टियर, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

जालना – छपरा उत्सव विशेष गाडी (८ फेऱ्या)

उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जालना–छपरा साप्ताहिक उत्सव विशेष गाडी महत्त्वाची ठरणार आहे. गाडी क्रमांक ०७६५१ जालना येथून ७, १४, २१ आणि २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३५ वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता छपरा येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६५२ छपरा येथून ९, १६, २३ आणि ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता जालना येथे पोहोचेल.

या विशेष गाडीच्या दोन्ही दिशांच्या मिळून ८ फेऱ्या होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी या गाडीला भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीमध्ये एसी-२ टियर, एसी-३ टियर, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

नांदेड–उधना विशेष गाडीच्या १६ फेऱ्या

गुजरातच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी हजूर साहिब नांदेड–उधना उत्सव विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०७६०५ नांदेडहून ५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी रात्री ११.१० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता ती उधना येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६०६ उधना येथून ६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता नांदेडला पोहोचेल.

या गाडीच्या दोन्ही दिशांच्या मिळून १६ फेऱ्या होणार आहेत. विशेष म्हणजे या गाडीला भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर आणि नंदुरबार येथे थांबे देण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button