जळगावकरांनो, लक्ष द्या! गणेश विसर्जनामुळे ‘या’ मार्गांवरील वाहतूक राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

सप्टेंबर 24, 2026 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील वाहतुकधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार असून विसर्जन मार्ग ते विसर्जनस्थळापर्यंत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल करण्याची अधिसूचना काढली आहे.

GNvisarjan

त्यानुसार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत मिरवणूक मार्गावर एस.टी. बसेस, अवजड वाहने, कार आणि दुचाकी या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे.

असा असेल गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग

सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू पुतळा, गोलाणी मार्केट, नटवर टॉकीज, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, लालशाह बाबा दर्गा, भिलपुरा चौकी, बालाजी मंदिर, बागवान मोहल्ला, जोशी पेठ, सुभाष चौक, बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, सिद्धी कॉलनी, इच्छादेवी चौक, तांबापुरा व जुना शिरसोली नाका मार्गे मेहरुण तलावाकडे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून वाहनांसाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

जळगाव-पाचोरा मार्गावरील वाहतूक वळविली

इच्छादेवी चौकी, डी-मार्ट, मोहाडी रोड, वाय-पॉइंट, गायत्रीनगर, गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, हॉटेल ग्रेप्स, मलंगशाह बाबा दर्गा आणि शिरसोली रोड या मार्गावरील एसटी बसेस, अवजड वाहने तसेच इतर वाहनांची वाहतूक विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंद राहणार आहे.

जळगावहून पाचोराकडे जाणाऱ्या बसेस, कार आणि दुचाकींसाठी आकाशवाणी, काव्यरत्नावली, महाबळ, गाडगेबाबा चौक, राजे संभाजी चौक, गुरू पेट्रोल पंप आणि मलंगशाह बाबा दर्गा मार्गे पाचोराकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचोराहून जळगावकडे येणारी वाहनेही याच पर्यायी मार्गाचा वापर करतील.

असोदा-भादलीकडील वाहतूक

असोदा-भादलीकडून येणारी-जाणारी वाहने मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, कालिका माता मंदिर मार्गे महामार्गावरून अजिंठा चौक, आकाशवाणी चौक आणि नवीन बसस्थानक या मार्गाचा वापर करतील.

यावल-चोपडाकडील वाहनांसाठी पर्यायी मार्ग

यावल आणि चोपडाकडून ये-जा करणाऱ्या वाहनांना आकाशवाणी, शिव कॉलनी, खोटे नगर, निमखेडी रोड, रेल्वे गेट आणि शिवाजीनगर या मार्गाने वळविण्यात आले आहे.

कानळदा-भोकर मार्गावरील वाहतूक

कानळदा आणि भोकरकडून येणारी-जाणारी वाहने स्वातंत्र्य चौक, रिंगरोड, गोकूळ स्वीट मार्ट आणि सुरेश कलेक्शन उड्डाणपूल या पर्यायी मार्गाचा वापर करतील.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now