जळगाव लाईव्ह न्यूज । पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या केल्याच्या २०१७ मधील खटल्यात भुसावळ न्यायालयाने पतीसह नणंदेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनिल स्तन साळुंके (३८) आणि सुनीता देवराम पवार (४०, रा. कुंभारवाडा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?
२८ जुलै २०१७ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात उषा साळुंखे (रा. पांडुरंग टॉकीजसमोर, भुसावळ) यांच्या मृत्यूची सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यांना अपस्माराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता मृत्यूबाबत संशय निर्माण झाला.

तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपासाधिकारी निलोत्पल (IPS) यांनी केलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आले. उषा यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांचे पती अनिल साळुंखे आणि नणंद सुनीता पवार यांनी संगनमताने त्यांना लाकडी जळाऊ फाट्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्राव झाल्याने उषा यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी उपनिरीक्षक अनिस अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अनिल साळुंके आणि सुनीता पवार यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ जुलै २०१८ रोजी न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.
खटल्यादरम्यान ३४ साक्षीदारांपैकी १६ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सरकारी अभियोक्ता विजय खडसे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या या खून प्रकरणाचा निकाल लागल्याने मृत उषा साळुंके यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याचे मानले जात आहे.







