भयंकर! ताटातून घास उचलल्याच्या कारणावरून मित्राचीच दगडाने ठेचून हत्या

सप्टेंबर 22, 2026 10:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मित्रांसोबत सुरू असलेल्या पार्टीत ताटातून घास उचलल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना यावल तालुक्यातील भालोद शिवारात घडलीय. तीन नशेत धिंगाणा घालणाऱ्या मित्रांनी ४० वर्षीय सहकाऱ्याला दगडाने ठेचून तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केला.रमेश डोंगरसिंग भाबर (४०, रा. भालोद) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

murder raver

नक्की काय घडले?

भालोद येथील एका वाड्यात रविवारी रात्री मृतासह सूरज वासुदेव कोळी (२७), सुरज प्रमोद नेमाडे (३७) आणि अन्य एक जण एकत्र येऊन पार्टी करीत होते. यादरम्यान जेवताना ताटातील घास उचलण्यावरून रमेश आणि त्याच्या मित्रांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. संतापलेल्या तिघांनी रमेशवर दगडाने बेदम हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात रमेश जागीच मृत पावल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर तिघेही तेथून पसार झाले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे, पोलिस उपनिरीक्षक संतोष चौधरी, सहायक फौजदार संजय झाल्टे आणि हवालदार विकास सोनवणे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले

मृत रमेश भाबर यांचे भाऊ इंदसिंग भाबर यांच्या फिर्यादीवरून सूरज कोळी, सुरज नेमाडे आणि अन्य एका संशयिताविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now