आनंदाची बातमी! धरणगाव स्थानकावर ‘या’ एक्प्रेसला अधिकृत थांबा मंजूर

सप्टेंबर 21, 2026 12:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उधना–हसनपूर विशेष एक्स्प्रेसला धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाल्याची माहिती धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे आगामी सण-उत्सवांच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

dharangaon railway

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या माहितीनुसार, ०९०४१/०९०४२ उधना–हसनपूर ही विशेष एक्स्प्रेस ३ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत धावणार आहे. त्यामुळे दिवाळी, भाऊबीज आणि इतर सणांच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे. उधना येथून सुरू होणारी ही गाडी नंदुरबार, धरणगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज आणि समस्तीपूर मार्गे हसनपूरकडे जाणार असल्याचे मंडळाने नमूद केले आहे. खासदार स्मिता उदय वाघ यांच्याही पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचेही मंडळाने सांगितले आहे.

सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना मोठा फायदा

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षणासाठी मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत विशेष एक्स्प्रेसला धरणगाव येथे थांबा मिळाल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धरणगावसह एरंडोल, पारोळा, चोपडा आणि परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी धरणगाव हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now