पाण्याची चिंता काहीशी मिटली! जळगाव जिल्ह्यातील हे ७ प्रकल्प तुडुंब

सप्टेंबर 18, 2026 12:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यंदाच्या मान्सून पावसावर ‘एल निनो’ (El Nino) चा प्रभाव जाणवत असला, तरी जळगाव जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या धरणांमध्ये चांगला जलसाठा निर्माण झाला आहे. एकेकाळी तळ गाठलेल्या पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात ३० आणि ३१ जुलैसह गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जलसाठा ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

dam

मात्र, चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पाची स्थिती अद्याप अपेक्षेप्रमाणे सुधारलेली नाही. नांदगावच्या माणिकपुंज धरणातील जलसाठा सुमारे ८५ टक्क्यांवर असल्याने तेथून मन्याडमध्ये येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. परिणामी मन्याड धरणात सध्या सुमारे ४७ टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प समाधानकारक पातळीवर पोहोचले असले तरी भोकरबारी आणि मन्याड या दोन प्रकल्पांकडे अद्याप पाण्याच्या दृष्टीने लक्ष लागले आहे.

३०-३१ जुलैच्या पावसाने बदलले चित्र

जळगाव जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यानंतर गिरणा, अंजनीसह अनेक प्रकल्प ओसंडून वाहू लागले. मात्र, त्यावेळी भोकरबारी आणि मन्याड हे प्रकल्प अपेक्षित पातळीपर्यंत भरले नव्हते.

म्हसवे तलाव पूर्ण भरल्यानंतर त्यातून वाहून जाणारे पाणी भोकरबारी धरणात पोहोचते. त्याचप्रमाणे मन्याड प्रकल्पाच्या पाणीसाठ्यासाठी नांदगावच्या माणिकपुंज धरणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. यंदा म्हसवे आणि माणिकपुंज हे दोन्ही प्रकल्प उशिराने भरल्याने त्याचा परिणाम भोकरबारी आणि मन्याडच्या जलसाठ्यावर झाला आहे.

जिल्ह्यातील ७ प्रकल्प तुडुंब

यंदा आतापर्यंत जिल्ह्यातील ७ प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले आहेत. यामध्ये गिरणा, अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा आणि बोरी या प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे, मोर प्रकल्पात ९५ टक्के तर बहुळा प्रकल्पात २४ टक्के जलसाठा असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा जलसाठा अधिक

विशेष म्हणजे, धरणांची स्थिती पाहता यंदा १०० टक्के भरलेल्या प्रकल्पांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी एकूण जिल्ह्याचा जलसाठा मात्र अधिक आहे.गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ७६.११ टक्के जलसाठा होता. यंदा याच कालावधीत हा जलसाठा ८०.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण जलसाठ्याच्या दृष्टीने स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे. मात्र, भोकरबारी आणि मन्याड प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी पाण्याची गरज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now