जळगाव लाईव्ह न्यूज । गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने जळगाव शहरात गणेशभक्तांची गणेशमूर्ती खरेदीसाठी जोरदार लगबग सुरू झाली आहे. शहरातील विविध भागांत गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली असून, रिंग रोडवर बहिणाबाई उद्यान ते आकाशवाणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल सजले आहेत.

विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि मनमोहक रूपातील गणेशमूर्ती सध्या भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तींमध्ये विविध कलात्मक रूपे पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने पद्मासनातील गणराय, बालगणेश, सिंहासनावर विराजमान मूर्ती, तसेच हत्तीवर आरूढ गणेश यांसारख्या विविध आकर्षक रूपातील मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा तसेच त्याच्या किमतीत झालेली वाढ यामुळे मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढला आहे. परिणामी, मूर्तींच्या किमतींवर याचा थेट परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
एकाच ठिकाणी सजावटीचे साहित्य उपलब्ध
गणेशभक्तांच्या सोयीसाठी मूर्तीसोबतच गणरायाच्या सजावटीसाठी आवश्यक असलेले हार, फुले, मखर यासह विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य आणि पूजेचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जळगावकरांना एकाच ठिकाणी मूर्ती आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्याची उत्तम सुविधा उपलब्ध झाली असून, शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.










