जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या महिना-दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर शुक्रवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. दिवसभर उकाड्याचे वातावरण असताना सायंकाळनंतर अचानक ढग दाटून आले आणि हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच जोरदार पाऊस झाला. या लांबलेल्या पावसामुळे चिंतेत पडलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर अखेर आशेचे किरण निर्माण झाले आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) १२ आणि १३ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे पुढील दोन ते तीन दिवस जळगावसह राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांत आज पावसाचा जोर
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज १२ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून चोपडा, धरणगाव, अमळनेर, पाचोरा, भडगाव, पारोळा, जळगाव आणि चाळीसगाव या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.
यानंतर रविवार, १३ सप्टेंबर रोजी चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव या तालुक्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रात्री मुसळधार पावसाने जळगावकरांना दिलासा
शुक्रवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हलक्या सरींनी पावसाला सुरुवात झाली. मात्र, अवघ्या काही वेळातच या सरींचे रूपांतर जोरदार पावसात झाले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरात मुसळधार पाऊस कोसळला. पावसासोबतच सुसाट वारे वाहू लागल्याने वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जाणवत असलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या जळगावकरांना या पावसाने अखेर दिलासा दिला. दुसरीकडे, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठीही ही हजेरी महत्त्वाची ठरली असून, आगामी दोन दिवसांत अपेक्षित पाऊस झाल्यास पिकांना मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे.







