जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराबाहेरील महामार्गावरील खचलेल्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या जड वाहतुकीच्या मार्गात करण्यात आलेल्या बदलांना आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित अधिसूचनेनुसार, आता २४ सप्टेंबरपर्यंत बायपासवरील वाहतूक बंद राहणार असून, सर्व जड वाहने शहरातील महामार्गावरूनच वळविण्यात आली आहेत.

जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-नागपूर महामार्गावरील दोन रेल्वे पुलांजवळील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भुसावळकडून आसोदाकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावरील रस्ता तसेच पाळधीकडून भुसावळकडे जाणाऱ्या सुरत रेल्वे पुलावरील रस्ता खचला होता. या दोन्ही ठिकाणी सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

असे असतील पर्यायी मार्ग
भुसावळ/नागपूर ते धुळे/मुंबई :
भुसावळ – तरसोद फाटा – कालिका माता मंदिर – अजिंठा चौफुली – आकाशवाणी चौक – शिवकॉलनी – बांभोरी पूल – पाळधी मार्गे धुळे.
छत्रपती संभाजीनगर ते नागपूर आणि परतीचा मार्ग :
छत्रपती संभाजीनगर – पाहूर – जामनेर – नाहटा चौफुली (भुसावळ) मार्गे नागपूरकडे.
इंदूर/बडोदा/नंदुरबार ते भुसावळ/नागपूर आणि परतीचा मार्ग :
चोपडा – अडावद – यावल – भुसावळ मार्गे वाहतूक करता येणार आहे.
पर्यायी मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त
वाहतुकीतील बदलामुळे वाहनधारकांना कोणताही गोंधळ होऊ नये तसेच अपघात टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.दरम्यान, जड वाहनचालक आणि मालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










