जळगाव लाईव्ह न्यूज । महायुतीमध्ये संख्याबळाच्या आधारावर भाजप मोठा भाऊ असला, तरी मित्रपक्षांच्या मनात मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही महत्त्वाकांक्षा कायम असल्याचे दिसून येत आहे. यातच आता नंदुरबार येथील शिवसेनेच्या एका मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा आगामी काळात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा दावा करत राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?
नंदुरबारमधील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत जोरदार भाषण ठोकले. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मोठा वाटावा यात काही गैर नाही, असे सांगत त्यांनी थेट मुळालाच हात घातला. “आमचे नेते एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत,” असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस येतील, असे विधान केलं. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित शिवसैनिकांमध्ये जोश भरला असला, तरी महायुतीतील इतर पक्षांच्या गोटात याची नक्कीच चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना गुलाबराव पाटलांनी उद्धव सेना आणि इतर विरोधकांवरही कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांना संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पक्षाची बदनामी करणे आणि चिन्ह गोठवण्यासारख्या गोष्टीमागे कोण आहे, हे सगळे सुपाऱ्या घेऊन करत आहेत.” मात्र, आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास असून लवकरच योग्य निर्णय दिला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.








