आधी अधिकारी, आता कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू! यावल कृषी कार्यालयावर पुन्हा शोककळा

सप्टेंबर 10, 2026 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुका कृषी कार्यालयावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता कार्यालयातील कर्मचारी हैदर हबीब तडवी (वय ५२) यांचेही निधन झाले. अवघ्या आठवडाभरात याच कार्यालयातील दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाल्याने कृषी कार्यालयात मोठी शोककळा पसरली आहे.

haidar tadvi

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, हैदर हबीब तडवी हे यावल तालुका कृषी कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते मूळचे रावेर तालुक्यातील कळमोदा येथील रहिवासी असून सध्या यावल शहरातील तडवी कॉलनी येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी त्यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपली कार्यालयीन सेवा प्रामाणिकपणे बजावली. त्यानंतर कार्यालय बंद करून ते आपल्या घरी परतले.

मात्र, सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांना अचानक प्रकृतीत अस्वस्थता जाणवू लागली. प्रकृती वेगाने बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर आणि परिसरात हळहळ

हैदर हबीब तडवी यांच्या अचानक निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच तडवी कॉलनी परिसर आणि शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाने वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार शोकाकुल झाला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मित्रपरिवार आणि कृषी विभागातील सहकारी व अधिकाऱ्यांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, यावल तालुका कृषी कार्यालयात अवघ्या सात दिवसांच्या आत घडलेली ही दुसरी दुर्देवी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांचेही अशाच प्रकारे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. एकापाठोपाठ एक अशा दोन सहकाऱ्यांच्या निधनाने कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीसह कमालीची संवेदनशीलता व शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now