जळगाव लाईव्ह न्यूज । शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले असतानाच ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात केली आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून राज्यातील ४८ पैकी तब्बल ४० लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाने संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे. मात्र, या यादीत जळगावचा समावेश करण्यात आलेला नाही.

राजकीय वर्तुळात जळगाव हा नेहमीच अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. असे असतानाही ठाकरे गटाने राज्यातील बहुतांश मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती झालेली असताना जळगाव मतदारसंघाबाबत मात्र पक्षाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुलाबराव वाघ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

कोणत्या नेत्यावर कोणती जिल्ह्याची जबाबदारी?
पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी वरुण सरदेसाई, शिर्डी-अहिल्यानगरसाठी सुनील शिंदे, छत्रपती संभाजीनगरसाठी आशीष चेंबुरकर, शिरूरसाठी किरण तावडे, पुणे जिल्ह्यासाठी सचिन पडवळ, सोलापूर-माढासाठी सुषमा अंधारे, नाशिक-दिंडोरीसाठी रविंद्र मिर्लेकर यांचा समावेश आहे.
बुलढाण्यासाठी नितीन देशमुख आणि नरेंद्र खेडेकर, अकोल्यासाठी नितीन देशमुख आणि नीलेश घुमाळ, अमरावतीसाठी नितीन देशमुख आणि डॉ. किशोर ठाकरे, हिंगोलीसाठी बबनराव थोरात, कोल्हापूरसाठी अरुण दुधवडकर, बारामतीसाठी संजय सावंत, धुळ्यासाठी अशोक धात्रक तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुलाबराव वाघ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय नंदुरबारसाठी मुकेश साळुंके, रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी प्रदीप बोरिकर, रायगडसाठी संजय मानाजी कदम, मावळसाठी प्रसाद भोईर, पालघरसाठी विलास पोतनीस, हातकणंगलेसाठी महेंद्र इंदुलकर, जालन्यासाठी सुनील वामन पाटील, धाराशिवसाठी सुनील काटमोरे आणि नांदेडसाठी किशोर पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील परभणीसाठी प्रदीपकुमार खोपडे, लातूरसाठी परमेश्वर सातपुते, बीडसाठी अशोक सकपाळ, यवतमाळ-वाशिमसाठी दिलीप जाधव, वर्ध्यासाठी सुधीर सूर्यवंशी, नागपूरसाठी सतीश हर्डे, रामटेकसाठी सुरेश सावंत, गडचिरोली-चिमूरसाठी महेश केदारी, चंद्रपूरसाठी प्रशांत कदम आणि भंडारा-गोंदियासाठी राजू पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघाचा या नियुक्त्यांमध्ये समावेश नसल्याने जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक हालचालींकडे आता लक्ष लागले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाबाबत पक्षाकडून स्वतंत्र निर्णय घेतला जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीत पक्षाकडून येथे कोणाला जबाबदारी दिली जाते, याकडे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.






