जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव बाहेरून गेलेल्या पाळधी – तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. बायपासवरील पाळधी गावाजवळ भरधाव कंटेनरचा अचानक ताबा सुटल्याने तो रस्त्यावर पलटी झाला. याचवेळी कंटेनरखाली दोनगाव बुद्रुक येथील दुचाकीस्वार तरुण दबला गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करण जनार्दन सोनवणे (वय २६) असं अपघातातील मृत्यू तरुणाचं असून या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे महामार्गावर काही काळ मोठी गर्दी झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर पलटी झाला आणि त्याखाली दुचाकीस्वार करण सोनवणे अडकला. कंटेनरखाली दबल्याने करण सोनवणे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पुढील कार्यवाहीसाठी मदत केली. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्य आणि इतर प्रक्रियेत सहकार्य केले. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा व अन्य आवश्यक कार्यवाही सुरू केली.
बायपासचे काम बंद असल्याने संताप
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बायपास रस्त्याचे काम सुरू असल्याने संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. अपघातानंतर नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला.










