जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराजवळ मोबाईल हिसकावून मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन जणांना वाहतूक पोलिसांनी अडवून पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पीडिताचा मोबाईलही तात्काळ परत मिळाला.

ही कारवाई काल ८ सप्टेंबर रोजी आकाशवाणी चौकात वाहतूक पॉईंट ड्युटीवर असलेले एएसआय दीपक बनसोडे आणि पोलिस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराच्या बाजूने एक व्यक्ती जात असताना दोन इसमांनी त्याला अडवून त्याचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर दोघे जण मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ ईटी ८३६७) वरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. याच वेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवून मोटारसायकल ताब्यात घेतली. अमोल एकनाथ बोदडे (वय 30 रा.रामनगर महाबळ जळगाव) व तौसिफ बेग खलील बेग (वय 32 रा. समता नगर जळगाव) असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.
तपासणीदरम्यान पीडिताचा मोबाईल आरोपींकडून मिळाल्याने तो त्याच्या ताब्यात परत देण्यात आला. घटनेची माहिती तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला वायरलेसद्वारे देण्यात आली. यानंतर दोन्ही आरोपी तसेच ताब्यात घेतलेली मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आली.










