यावलचा मुख्य रस्ता होणार चकाचक; ६.५० किमी काँक्रीटीकरणाचा शुभारंभ

सप्टेंबर 5, 2026 11:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । बऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याबरोबरच दळणवळण, व्यापार-व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

ywl

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम आगामी काळात वेगाने पुढे जाणार आहे. या महामार्गामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना बायपासची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक शहराबाहेरून वळल्यानंतर शहरांतर्गत रस्त्यांचा वापर, वाहतुकीचे नियोजन आणि स्थानिक दळणवळण यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर यावल शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते सक्षम करण्याची गरज लक्षात घेऊन समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ६.५० किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १४ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या रस्त्यामुळे शहरातील विविध भागांमधील दळणवळण अधिक सुकर होण्याबरोबरच स्थानिक बाजारपेठ, दुकाने आणि व्यावसायिक व्यवहारांनाही चालना मिळण्याची शक्यता आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता हा रस्ता यावलच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now