जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, भागपूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत एकूण १,३९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील गोलटेकडी (ता. पाचोरा) लघु पाटबंधारे तलाव आणि एकुलती (ता. जामनेर) साठवण तलावाच्या बांधकामासाठी ८०.०७ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.

भागपूर उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात तापी नदीवरून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी पंपांद्वारे उचलून भागपूर धरणात साठविण्याचे नियोजन आहे. तर दुसऱ्या टप्प्यात भागपूर प्रकल्पातून पाणी उचलून गोलटेकडी लघु पाटबंधारे तलाव आणि एकुलती साठवण तलावात साठविण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये वर्षभर पाणीसाठा उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.

गोलटेकडी लघु पाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ६.०० दशलक्ष घनमीटर असून, त्याद्वारे १,००३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच एकुलती साठवण तलावाची क्षमता १.७५६ दशलक्ष घनमीटर असून, त्यातून ३९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकल्पांमधून एकूण १,३९५ हेक्टर शेतीला सिंचनाचा शाश्वत आधार मिळणार आहे.
दुष्काळी परिस्थिती असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची या दोन्ही प्रकल्पांसाठी दीर्घकाळापासून मागणी होती. पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतीसमोरील अडचणी वाढत होत्या. आता या प्रकल्पांना प्रत्यक्ष गती मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पांचे काम मार्गी लागले आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यास मदत होणार आहे.
पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेकडे महत्त्वाचे पाऊल मंत्री गिरीश महाजन
भागपूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून ते साठवण तलावांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाण्याचा अधिक परिणामकारक वापर होऊन दुष्काळी भागातील शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी, पिकांच्या उत्पादनात वाढ आणि गावागावात समृद्धी आणण्याच्या दिशेने भागपूर उपसा सिंचन योजना महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
- मंत्री गिरीश महाजन






