जळगाव लाईव्ह न्यूज । नागरिकांच्या आपत्कालीन मदतीसाठी कार्यरत असलेल्या डायल ११२ सेवेत जळगाव जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्याने नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी प्रतिसाद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यात डायल ११२ वर ३,१६७ कॉल्स प्राप्त झाले. या कॉल्सना पोलिसांकडून सरासरी ६ मिनिटे १८ सेकंदांत प्रतिसाद देण्यात आला. नाशिक परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा सर्वात कमी प्रतिसाद वेळ आहे.

नाशिक ग्रामीण येथे ४,३२५ कॉल्ससाठी प्रतिसाद वेळ ६ मिनिटे २७ सेकंद, नंदुरबार येथे ५१६ कॉल्ससाठी ६ मिनिटे ४५ सेकंद, अहिल्यानगर येथे ७,३८३ कॉल्ससाठी ८ मिनिटे ०४ सेकंद, तर धुळे येथे १,७४८ कॉल्ससाठी ८ मिनिटे ११ सेकंद इतका प्रतिसाद वेळ नोंदविण्यात आला.
नाशिक परिक्षेत्रात ऑगस्ट महिन्यात डायल ११२ वर एकूण १७,१३९ कॉल्स प्राप्त झाले. यामध्ये सर्वात कमी प्रतिसाद वेळ नोंदवून जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद आणि प्रभावी पोलीस मदत मिळावी, यासाठी डायल ११२ यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जळगाव जिल्हा पोलीस दलाचा भर आहे. या कामगिरीमुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत पोलीस मदत उपलब्ध करून देण्याची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.






