जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी येथे ३१ जुलै रोजी घडलेल्या एका कथित आत्महत्येच्या घटनेला तब्बल महिन्यानंतर धक्कादायक वळण मिळाले आहे. राधेशाम हरचंद राठोड (वय २६) याने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात हा आत्महत्येचा प्रकार नसून कुटुंबीयांनीच संगनमत करून केलेला खून असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मयताच्या आई-वडिलांसह भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता राधेशाम राठोड याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलून कसून चौकशी सुरू केली.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, राधेशामला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत दररोज घरी येऊन आई-वडील आणि भावाला मारहाण करत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या सततच्या त्रासाला कुटुंबीय कंटाळले होते. याच त्रासातून राधेशामचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय आरोपींनी घेतल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
३१ जुलै रोजी आरोपींनी आपापसात संगनमत करून राधेशामला दोरीच्या साहाय्याने गळफास दिला. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा कट रचण्यात आला. एवढेच नव्हे, तर ज्या दोरीचा वापर करण्यात आला होती, ती जाळून टाकत हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर राधेशामने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवून आरोपींनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे मानून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना घटनेबाबत संशय आल्याने त्यांनी बारकाईने तपास सुरू केला. घटनाक्रम, कुटुंबीयांची चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली. अखेर आरोपींचा बनाव उघडकीस आला आणि राधेशामची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मयताची आई मीराबाई हरसिंग राठोड, वडील हरसिंग उर्फ हरचंद नथ्यु राठोड व भाऊ सचिन हरसिंग राठोड या तिघांना अटक केलीय. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली







