जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात सुरू असलेल्या एका अवैध वेश्याव्यवसायाचा रामानंदनगर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या मदतीने पर्दाफाश केला आहे. कुंभारवाड्या समोरील एका बंगल्यावर ही धडक कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून ४ पीडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बंगल्यात अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. पथकाने आधी एक ‘डमी ग्राहक’ त्या बंगल्यावर पाठवला. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच डमी ग्राहकाने पोलिसांच्या पथकाला मिस्ड कॉल देऊन इशारा केला. संकेत मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तात्काळ बंगल्यावर छापा टाकला.

छाप्यादरम्यान पोलिसांना घटनास्थळी ४ पीडित महिला, ३ ग्राहक आणि १ पंटर मिळून आले. तपासात १ महिला आणि २ पुरुष अशा एकूण तीन मुख्य आरोपींचा या रैकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चारही पीडित महिलांची सुटका करत आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी प्रोबेशनरी सह्याद्री बिर्ले, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तसेच AHTUच्या API माधुरी बोरसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये PSI दिनेश बडगुजर, हेड कॉन्स्टेबल अमित माळी, संघपाल तायडे, PSI राजेश पाटील, ASI अनिल पाटील, ASI भूषण कोल्हे, पोलीस हवालदार दीपक पाटील, किरण धनगर, मनीषा पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल राखी खाटिक यांच्यासह पोलिस पथकाने सहभाग घेतला.
जळगाव शहरातील अवैध वेश्या व्यवसायाविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाणे व संबंधित पथकाकडून सुरू आहे.









