जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२६ । सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाली असून प्रत्येक सिलिंडरमागे ९.५० रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत. तर १४.२-किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी आता २७४७.५० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा सिलेंडर २७३८ रुपयांना मिळत होता. तर मुंबईत २७०१.५० रुपये झाली आहे. दरम्यान, घरगुती १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

ऑगस्टमध्ये झाली होती मोठी कपात
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल १९२ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत १९ किलोचा सिलेंडर २९३० रुपयांवरून थेट २७३८ रुपयांवर आला होता. त्याआधी जुलैमध्येही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली होती.
त्यामुळे सप्टेंबरमध्येही दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, तेल कंपन्यांनी उलट दरवाढ केल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ आणि व्यावसायिक वापरासाठी एलपीजीवर अवलंबून असलेल्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजीच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ९४१.५० रुपये आहे.











