जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. बहिणीच्या हातावर राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा आनंद साजरा करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने काही तासांतच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना शहरातील दशरथ नगर परिसरात घडली. रोहित साहेबराव धनगर असे मृत तरुणाचे नाव असून आत्म#$हत्येपूर्वी त्याने मोबाईलवर ‘हॅपी रक्षाबंधन ताई’ असा स्टेटस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन मोबाईल गेम आणि त्यातील आर्थिक व्यवहारामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रोहित हा आई-वडील आणि लहान बहिणीसोबत आसोदा रोडवरील दशरथ नगर परिसरात राहत होता. शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सकाळी रक्षाबंधनानिमित्त बहिणीने रोहितच्या हातावर राखी बांधली. त्यानंतर त्याने आईला मामाच्या गावी जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर सोडले. दुपारी तो वडिलांसोबत मेहरुण परिसरातील आत्याच्या घरी गेला. दरम्यान, दुपारी दोन वाजेच्या सुमारास ‘माझे एक काम आहे, मी थोड्या वेळात येतो,’ असे सांगून रोहित घरी परतला. त्यावेळी घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेतला.

काही वेळाने नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रोहितला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
राखीचा धागा अन् कुटुंबीयांचा आक्रोश
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी बहिणीने ज्या हातावर राखी बांधली होती, त्याच हातावर राखी असलेल्या अवस्थेत रोहितचा मृतदेह रुग्णालयात पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. काही तासांपूर्वी आनंदात साजरा झालेला रक्षाबंधनाचा सण अचानक दुःखात बदलल्याने धनगर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्याचा संशय
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात रोहितला विविध ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. या गेममधील आर्थिक व्यवहारांमुळे तो नैराश्यात होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच कारणातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.










