हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर हृदयविकाराशी संबंधित पामी ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयविकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या उपचारामुळे महिलेच्या हृदयाशी संबंधित गंभीर समस्येवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ मिळाल्याने आर्थिक दिलासाही मिळाला.

थोरगव्हाण येथील ७२ वर्षीय महिला हृदयाशी संबंधित त्रासामुळे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. याठिकाणी हृदयालयाचे विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अली अदनान यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या व तपासण्या केल्या. तपासणीच्या अहवालानुसार रुग्णाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळा असल्याचे निदर्शनास आले. रुग्णाचे वय तसेच हृदयाची स्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पुढील उपचाराची दिशा निश्चित केली.

टीमच्या अथक प्रयत्नाला यश
रुग्णावर पामी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्याधुनिक कॅथलॅबच्या सहाय्याने हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अली अदनान, डॉ. झिशान सय्यद यांच्या टीमने ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या हृदयाची स्थिती सातत्याने निरीक्षणाखाली ठेवण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, परिचारिका तसेच तांत्रिक कर्मचार्यांच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.वयोमान अधिक असूनही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ आणि रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय पथकामुळे उपचार यशस्वी झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.या उपचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला.
हृदयविकाराची लक्षणे दिसून आल्यास वेळ न दवडता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे, अस्वस्थपणा किंवा अचानक अशक्तपणा जाणवल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
- डॉ. अली अदनान, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.







