जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर खौशी येथे तलावात बुडालेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला. याचदरम्यान रेल्वेखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली.

टाकरखेडा येथे पहाटेच्या सुमारास सुनील अमृत भिल, त्यांच्या पत्नी पार्वती सुनील भिल आणि दोन मुले सनी व राज यांनी रेल्वेखाली येऊन जीव गमावल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, खौशी गावात तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. तलावात बुडत असलेल्या मुलाला पाहून वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात प्रवेश केला. मात्र, तलावातील गाळात दोघेही अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रयत्नांनंतर दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. बाप-लेकाच्या या दुर्दैवी मृत्यूने खौशी गावावर शोककळा पसरली आहे.
याशिवाय बुधवारी सायंकाळी एका अनोळखी व्यक्तीने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटनाही समोर आली. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अवघ्या काही तासांत घडलेल्या या घटनांमुळे अमळनेर तालुक्यातील वातावरण शोकाकुल झाले आहे. टाकरखेडा येथील घटनेचे नेमके कारण आणि खौशी येथील दुर्घटनेमागील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.










