आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

ऑगस्ट 18, 2026 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमधून पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ पाटील (रा. आदर्शनगर, जुन्या आरटीओजवळ, जळगाव) असे संशयित लाचखोराचे नाव असून या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.

lach jpg webp

काय आहे प्रकरण?
तक्रारदार एक खासगी वकील असून ते दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी गत १ जुलै २०२६ रोजी खान्देश मोटर्स शोरूमधून मारुती कंपनीची ‘अल्टो के-१० व्हीएक्सआय’ कार खरेदी केली होती. ३ ऑगस्ट रोजी संशयित एजंट योगेश पाटील याच्यामार्फत या कारची तात्पुरती नोंदणी करण्यात आली.

कारमध्ये हॅण्डकिट बसविल्यानंतर, कायमस्वरूपी पासिंगबाबत १२ ऑगस्ट रोजी तक्रारदारांनी आरटीओ कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी एजंट योगेश पाटील याने आरटीओ अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नावाने सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी केली. नंतर तडजोड होऊन हा आकडा ८,५०० रुपयांवर ठरला.

या प्रकारामुळे तक्रारदारांनी १७ ऑगस्ट रोजी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली असता, योगेश पाटील याने ८,५०० रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये घेण्याचे मान्य केले.त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजीच इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूम परिसरात एसीबीने सापळा रचला. योगेश पाटील याने पंचांसमक्ष ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण घोटाळ्यात इतर आरटीओ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे, या दिशेनेही एसीबीकडून अधिक तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now